‘शांतीनिकेतन’मध्ये भाजपचे गुंडगिरीला आव्हान
- By : Anirban Ganguly
- Category : In News
महेश सरलष्कर
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची कर्मभूमी असलेल्या ‘शांतीनिकेतन’मध्ये म्हणजे बिरभूम जिल्ह्यातील बोलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपने तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीला आव्हान दिले आहे. पण इथून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूरमध्ये मात्र स्वच्छ प्रतिमेचा आग्रह भाजपने धरलेला दिसला नाही.
बोलपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला महत्त्व नसते. या शहराचा तृणमूल काँग्रेसचा नेता अनुब्रत मंडल यांचे बिरभूमी जिल्ह््यावर राज्य चालते. शांतीनिकेतन बाजाराच्या चौकात मंडलचे घर आणि तृणमूलचे कार्यालय. घराच्या चिंचोळ्या बोळात झेंडे, पत्रक कार्यकत्र्यांना वाटली जात होती. तिथे अनुब्रत यांचे भलेमोठे छायाचित्र होते, पण तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचे चित्र गायब होते. त्याचे स्वतंत्र छायाचित्र शहरात कुठेही दिसले नाही. तृणमूल काँग्रेसच्या म्होरक्याची ‘जरब’ असल्याने लोक बोलण्यास नकार देतात. बोलपूरमधील प्रभाग सातमध्ये दोन-चार व्यक्ती बसू शकतील इतके माकपचे छोटे प्रभाग कार्यालय असून तिथे न घाबरता दोघा-तिघांनी बोलपूरची परिस्थिती स्पष्ट केली. ‘पंचायत निवडणुकीत मंडलच्या लोकांनी आम्हाला मतदान करू दिले नव्हते. पण, विधानसभेसाठी लोक मतदान करायला बाहेर पडतील. केंद्रातून सुरक्षा व्यवस्था तैनात असल्याने हिंसाचार होण्याची शक्यता नाही,’ असा अन्योन भट्टाचार्य यांचा दावा होता. ‘आमच्या संयुक्त आघाडीचा उमेदवार जिंकला तर उत्तमच पण, भाजपचा जिंकला तरी चालेल. मात्र यंदा तृणमूल काँग्रेस नको,’ असे दिलीप हाजरा यांचे म्हणणे होते.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी फाऊंडेशनचे प्रमुख अनिर्बन गांगुली यांना भाजपने बोलपूरमध्ये उमेदवारी दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीला गांगुली यांची स्वच्छ प्रतिमा हे उत्तर असल्याचा प्रचार भाजप करत आहे. पण ‘उमेदवाराची प्रतिमा स्वच्छ असेल पण, नेते-कार्यकर्ते माकपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले, आता ते भाजपमध्ये आहेत. भाजपला आता त्यांना तृणमूलच्या बाहुबलीला आव्हान देण्यासाठी सर्वप्रकारची ‘मदत’ द्यावी लागेल, असे निवडणुकीचे वास्तव गणित नौशाद शेख यांनी मांडले.
माजी लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, नोबलविजेते अर्थतज्ज्ञ अमत्र्य सेन यांच्यामुळे बिरभूमची ओळख शिक्षित व सुसंस्कृत जिल्हा अशी होती. पण, गेल्या दशकभरात अनुब्रत मंडल यांच्या वर्चस्वामुळे बोलपूर हिंसाचाराचे केंद्र बनले आहे. यंदा भाजपने तगडे आव्हान दिले असले तरी, दोन्ही पक्षांना जिंकण्याची समान संधी असल्याची सावध आणि प्रातिनिधिक प्रतिक्रिया रुग्णालयातील कर्मचारी दिलीप मंडल या तरुणाने दिली. बिरभूम जिल्ह्याातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी ५-६ मतदारसंघ भाजपला मिळतील, असा दावा ‘रामभक्त’ पियुरा बॅनर्जी यांनी केला.
भाजपकडून स्वच्छ प्रतिमेचा अट्टहास नाही
तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीला आव्हान देताना अन्य विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपने स्वच्छ प्रतिमेचा अट्टहास धरलेला नाही. दुर्गापूरमधील कोळसामाफिया राजेश झा याला भाजपने प्रवेश दिला. गेल्या महिन्यात या भाजप नेत्याला अटक करण्यात आली. ‘तृणमूलच्या माफियांना भाजपही त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर देत आहे’, असा दावा मध्यमवयीन विप्लब सरकार यांचे म्हणणे होते. दुर्गापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे एस. एस. अहलुवालिया खासदार बनले. पण, ‘इथे पंचायत आणि पालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ‘माफियां’नी कोलकाताहून गुंड आणले होते, एकाही स्थानिकाला मतदान करू दिले नाही, त्याचा वचपा मतदारांनी काढला आणि भाजपला जिंकून दिले’, असे सरकार यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.